“भक्तांच्या हाकेला धावून येणारी रेणुका देवीमाझी रेणुका माऊली”..


प्रासंगिक लेख:-“२५ मार्च २०२६ श्री रेणुकादेवीच्या वासंतिक नवरात्रौत्सवाला प्रारंभ”
“भक्तांच्या हाकेला धावून येणारी रेणुका देवी”

“माझी रेणुका माऊली
“माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय”
नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. शक्ती म्हणजेच देवी. घरोघरी घटस्थापना केली जाते. अखंड दीपप्रज्वलित ठेवला जातो. नवरात्राचे नऊ दिवसांत युद्धात देवीने अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचाही वध केला. म्हणूनच महिषासूरमर्दिनी नाव रूढ झाले. या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या रूपांतही देवीची पूजा केली जाते. नवरात्राचे नऊ दिवस वेगवेगळय़ा फुलांच्या माळा घालण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. पहिली माळ शेवंती, सोनचाफा अशा पिवळय़ा फुलांची, दुसरी माळ मोगरा, तगर, अनंत, चमेली अशा पांढऱ्या फुलांची, तिसरी माळ गोकर्ण, निळी फुले, कृष्णकमळ, चौथी माळ अबोली, तेरडा, केशरी फुले, पाचवी माळ बेल, सहावी माळ कर्दळीची फुले, सातवी माळ झेंडूची फुले, आठवी माळ कमळ, गुलाब, जास्वंदी आणि नवव्या मांडला कुंकुमार्चन करतात.
रेणुका देवी भक्तांच्या हाकेला धावून येणारी मनोकामना पूर्ण करणारी माता म्हणून ओळखली जाते.रे णुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तीस्थळ म्हणून प्रसिध्द आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे. वेगळी प्रचीती आहे. कार्ल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिध्द आहे. सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत. असेच प्रसिध्द आणि नवसाला पावणाऱ्या रेणुका देवीचे मंदिर बुलडाणा मुख्यालयापासुन अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली शहरात आहे. दर वर्षी चैत्र पौर्णिमेला रेणुका देवीची यात्रा भरते.

चिखली येथील अतिप्राचीन असलेले श्री रेणुकामातेचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे सर्वश्रेष्ठ शक्तिपीठ आहे. उपासकांचे श्रध्दास्थान असलेले भक्तांच्या नवसाला पावणारे, भाविकांच्या मनोकामना पुर्ण करणारे जाज्वल्य आणि जागृत दैवत म्हणून भक्तगण येथे नियमित येतात. पूर्वी देवीच्या मंदिराभोवती घनदाट जंगल होते. मंदिराजवळ एक जिवंत पाण्याचा झरा नेहमी वाहत असल्यामुळे आपली तृष्णा भागवण्यासाठी येथे हिंस्त्र श्वापदाचा वापर होता. देवीसमोर दिपमाळीची तिन्ही बाजुंनी अर्ध चंद्राकृती उभी आराम वैभवात भर घालत होती. मंदिरापासून अर्ध्या मैलावरून वाहणारी जाबुंवती नदीच्या काठावर चिखली गाव वसलेले आहे. निजामशाहीच्या कालखंडात परधर्मीय सतत हल्ले करुन हिंदुंची मंदिरे उद्वस्त करीत असत. अशा कठीण काळात मंदिरातील मुर्तीचे संरक्षण करण्यासाठी गावातील वतनदार मंडळीनी हातात शस्त्र घेऊन देवीचे संरक्षण केले. दरम्यान देवीची पुजा अर्चा करण्यासाठी तपस्वी बचानंद महाराज यांची नेमणूक झाली. दरम्यान देवानंद, परमानंद, शिवानंद, नागानंद यांनी सद्गुरु बचानंद महाराज यांचे शिष्यत्व पत्करले, गुरुपदेश आज्ञेवरून त्यांनी ठिकठिकाणी जाऊन देवीची मंदिरे उभारून मठ बांधले.
परिसरातील शेलुद, गोदरी, तपोवन, मर्दडी, अमडापूर, शेंदला, जानेफळ, घाटपुरी, देऊळगाव काळे, लोणार, बुलडाणा येथे जाऊन देवीचा प्रसार केला. कालांतराने गुरुच्या गादीवर शिष्य बसण्याच्या परंपरेवरुन वाद निर्माण झाल्यामुळे येथील पंचांनी गुरुवारला देवीच्या पुजेेसाठी नेमले तेव्हापासून मंदिराचा कारभार पंच पाहत होते. आता विश्वस्त मंडळ सर्व कारभार पाहत आहे. विश्वस्त मंडळ आल्यापासून भाविकांना विविध सुविधा देण्याकडे लक्ष पुरविण्यात आले. जीर्णाेध्दाराचे कार्य हाती घेऊन मंदिरात अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. संस्थामध्ये दरवर्षी तीन उत्सव साजरे केल्या जातात. शारदीय नवरात्रोत्सव, बचानंद महाराज पुण्यतिथी आणि वासंतिक नवरात्रोत्सव, यातील श्री अश्विन शु. प्रतिपदा ते नवमीपर्यंत उत्सवाचे स्वरुप असते. घटस्थापनेपासून दररोज सामुहिक आरती भजन किर्तन, प्रवचन, देवी भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, भारूड, गोंधळ, गरबा आदी कार्यक्रम होत आहेत.
दरवर्षीप्रमाणे श्री रेणुकादेवी संस्थान व बचानंद स्वामी संस्थानच्या वतीने देवीचा वासंतिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रारंभ बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी होत असून यादिवशी सकाळी घटस्थापना होईल. गुरुवार दि. २६ ला श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने श्रीराम दरबार पटपूजा, गुलाल व पुष्प उधळण, आरती तसेच सकाळी १० वाजता ह.भ.प. राजेंद्र महाराज तळेकर यांचे प्रवचन होईल. दि. २७ मार्च रोजी स्वामी नारायण जयंती कार्यक्रम व रात्री ८ वाजता ऋणानुबंध बहु. सामाजिक संस्था अहिल्यानगर यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, दि. २८ मार्च ला दुपारी ४ वाजता भजनसंध्या, दि. २९ रोजी कामदा एकादशीनिमित्त भजन, गीतापाठ तसेच दि. ३० मार्च रोजी सोमप्रदेशनिमित्ताने शिवलीलामृत वाचन सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होईल. दि. ३१ मार्च रोजी ह.भ.प. शिवानीताई शिंदे यांचे किर्तन सायंकाळी ७ ते १० या वेळेत होईल. सदर कार्यक्रम हा जिल्हा बँकेच्या बाजुला, खामगाव चौफुली, चिखली येथे होणार आहे. बुधवार दि. १ एप्रिल ला सायंकाळी ७ ते १० या वेळेत ह.भ.प. राणीताई दौंड (नाशिक) यांचे किर्तन होईल. गुरुवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता ह.भ.प. राजेंद्र महाराज तळेकर यांचे श्री हनुमान जयंतीनिमित्त किर्तन सेवा व काल्याचे किर्तन होईल. सायंकाळी ७ वाजता ह.भ.प.सोनालीताई फडके (पुणे) यांचे किर्तन होईल. १ व २ एप्रिल रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत जिल्हा बँकेजवळ खामगाव चौफुली येथे डिगांबर महाराज आसावे (वरदडा) यांचे नेतृत्वात श्री रेणुका देवी महात्म हा कार्यक्रम होईल. दि. १ एप्रिल रोजी सकाळी शहरातील विविध नागरीक, विविध पतसंस्था, मंडळे, संघटना यांची पातळ मिरवणुक निघेल. रात्री ७ वाजता जुनेगावातील श्री गणपती मंदिरापासून भंदे मिरवणूक तर बसस्थानकापासून मशाल मिरवणूक निघेल. दि. २ एप्रिल रोजी प्रातःकाळी देवीला महाअभिषेक, महाआरती होईल. नंतर वगदी मिरवणूक, एम.टी. कर्मचारी यांचे मानाचे पातळ मिरवणूक, सायंकाळी ७ वाजतापासून वहन मिरवणूक निघेल. वहन मिरवणुकीत पंजाब येथील दिलेर खालसा पथक यांचे चित्तथरारक खेळ, झांज पथक, बँड पथक, लेझिम व टिपरी पथक, संबळ वादन, वाघ्या मुरळी आदी पथकांचा समावेश राहणार आहे. तसेच राऊतवाडी मित्र मंडळ, हरिओम मित्रमंडळ, संत गजानन महाराज मित्र मंडळ, माळीपुरा मित्र मंडळ, शिवराज पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य आतिषबाजी व महाप्रसाद वितरण होईल. दि. २ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता नवरात्री उत्थापन व पूजा अभिषेक, शेलूद वासियांचे मानाचे पातळ अर्पण करण्यात येईल. याशिवाय विविध संस्था, पतसंस्था, संघटना व भाविकांचे वतीने महाप्रसाद, पाणी, चहा वाटप करण्यात येणार आहे. वहन मार्ग- मंदिराला प्रदक्षिणा, लोकमान्य टिळक पुतळा, पंचायत समिती, वीर सावरकर नगर, खामगाव चौफुली, बसस्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजा टॉवर, चिंच परिसर, तलाठी कार्यालय, उदासिन महाराज मठ, पॉवर क्लब, महारुद्र हनुमान मंदिर, नदीजवळील चौफुली, गणपती मंदिर, मारुती मंदिर, चिंच परिसर, पोलिस चौकी, रोकडा हनुमान मंदिर, गुरुनानक मंदिरापासून मंदिरात परत येईल. शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री रेणुकादेवी मंदिरात आरती मंडळाचे वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुकादेवी संस्थान व बचानंद स्वामी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.
नवरात्री निमित्य रेणुका देवीच्या चरणी या पामर भक्ताची तोडक्या मोडक्या शब्दात सादर.
“मोठ्या मनाची आहे गुणाची
जशी सावली झाडाची
रेणुका भक्तांची ग भक्तांची
भोळया भक्तांची”
-नितिन प्रतापसिंह श्रीवास्तव
प्रतापगढ़, शिवशंकर नगर, बुलडाणा
मो.नं.९४२१४९४०४०.


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!