लोककवी वामनदादा कर्डक यांचे मानसपुत्र कवी-गायक दिगंबर पवार यांना ‘फुले-शाहू-आंबेडकर बहुमान पुरस्कार’ जाहीर


लोककवी वामनदादा कर्डक यांचे मानसपुत्र कवी-गायक दिगंबर पवार यांना ‘फुले-शाहू-आंबेडकर बहुमान पुरस्कार’ जाहीर.
गायनातून सामाजिक प्रबोधनाचा वसा; विविध शासकीय जनजागृती अभियानांत सक्रिय सहभाग
चिखली : फुले-शाहू-आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रसार आपल्या गायन व प्रबोधनाच्या माध्यमातून करणारे लोककवी वामनदादा कर्डक यांचे मानसपुत्र, कवी-गायक दिगंबर विक्रम पवार यांची ‘फुले-शाहू-आंबेडकर बहुमान पुरस्कार’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दिगंबर पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गायनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीचे कार्य केले आहे. सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा आणि सांप्रदायिक ऐक्याचा संदेश देणारी गीते सादर करून त्यांनी समाजात बंधुता आणि मानवतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक-कवी प्रतापसिंग बोदडे, गायक-कवी-लेखक विजयानंद जाधव यांसारख्या साहित्यिक व कलावंतांसोबत त्यांनी गायनाच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. तसेच फुले-आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ गायिकांसोबत गायन करून महापुरुषांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला आहे.
विविध शासकीय प्रबोधन कार्यक्रमांत सहभाग
दिगंबर पवार यांनी केवळ सामाजिक चळवळीपुरते मर्यादित न राहता विविध शासकीय प्रबोधन व जनजागृती कार्यक्रमांमध्येही गायनाच्या माध्यमातून सहभाग नोंदविला आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, पर्यावरण संवर्धन, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, व्यसनमुक्ती, कोरोना जनजागृती तसेच विविध सामाजिक विषयांवरील अभियानांमध्ये त्यांनी गीतांच्या माध्यमातून जनजागृती केली.
या कार्यक्रमांमध्ये मुलांचा आणि विद्यार्थ्यांचा गायनाच्या माध्यमातून सहभाग घडवून आणत सामाजिक संदेश प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कामही त्यांनी केले आहे. मनोरंजनासोबतच समाजप्रबोधन हा त्यांच्या गायनाचा प्रमुख उद्देश राहिला आहे.
लोककवी वामनदादा कर्डक यांच्या शाहिरी आणि प्रबोधनाच्या परंपरेचा वारसा पुढे नेत दिगंबर पवार यांनी गीत-संगीताच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांसोबतच सामाजिक समता, बंधुता, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश आपल्या कलाविष्कारातून जनतेपर्यंत पोहोचविला आहे.

बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचे कार्य केले जाते. समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक, कला, शौर्य, उद्योग आदी विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या तसेच मानवी मूल्ये आणि प्रबोधनात्मक विचारांचा प्रसार करणाऱ्या मान्यवरांचा फुले-शाहू-आंबेडकर बहुमान पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
याच उपक्रमांतर्गत गायन व प्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिगंबर विक्रम पवार यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पंढरपूर येथील पद्मनाभ पॅलेस हॉल, मंगल कार्यालयात आयोजित सातव्या राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलन-२०२६ मध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दिगंबर पवार यांच्या कार्याची आणि पुरस्कारासाठी झालेल्या निवडीची साहित्य, कला, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून दखल घेतली जात असून, चिखलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.


14
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!