युवा पत्रकार रुपेश पाटील बाजड यांची ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ साठी निवड


१५ मार्च रोजी राज्यपालांच्या हस्ते मुंबईत होणार सन्मान

मुंबई : सकारात्मक आणि समाजाभिमुख पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी व्हाइस ऑफ मीडिया या देशातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्डसाठी विदर्भ विभागातून युवा पत्रकार रुपेश पाटील बाजड (जि. वाशिम) यांची निवड करण्यात आली आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या तब्बल ६०० प्रस्तावांमधून विविध विभागातून एकूण १५ पत्रकारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये रुपेश पाटील बाजड यांचा समावेश असल्याने वाशिम जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
सकारात्मक पत्रकारितेद्वारे समाजात विधायक बदल घडवून आणणाऱ्या बातम्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून या पुरस्कारांचे आयोजन करण्यात येत आहे. समाजातील चांगल्या उपक्रमांना प्रकाशझोतात आणणे, सामाजिक जाणीवा जागृत करणे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करणे या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. युवा पत्रकार रुपेश पाटील बाजड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडण्यासोबतच सकारात्मक घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे सातत्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांचे वितरण १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे होणार आहे. या सोहळ्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे मंत्री मंगलप्रसाद लोढा तसेच अमृता फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये

दरम्यान, या पुरस्कारांची अधिकृत घोषणा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, संयोजक गोरक्षनाथ मदने आणि राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांनी केली. निवड प्रक्रियेत संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी संजय आवटे, चंद्रमोहन पुप्पाला, शंतनू डोईफोडे, दिव्या भोसले आणि ॲड. विवेक खरे यांनी निवड समिती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.
यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये कोकण विभागातून कुणाल लाडे (डहाणू) व संदेश साळुंके (रायगड), विदर्भ विभागातून शाहिद पठाण (गोंदिया) व रुपेश बाजड (वाशिम), पश्चिम महाराष्ट्रातून राहुल पवार (कराड) व स्वप्निल कांबळे (राधानगरी), उत्तर महाराष्ट्रातून ईश्वर महाजन (अमळनेर) व महेंद्रसिंग गिरासे (शिंदखेडा) आणि मराठवाडा विभागातून भारत सवणे (परतूर) व विनोद कांबळे (लातूर) यांचा समावेश आहे.
विशेष विंग अंतर्गत उर्दू विंगसाठी लियाकत पठाण (नाशिक), महिला विंगसाठी सारिका शिंदे (ठाणे), साप्ताहिक विंगसाठी संदीप पिंपळकर (वाशिम), रेडिओ विंगसाठी महेश जगताप (पुणे) आणि डिजिटल विंगसाठी मल्हारी ओमासे (सांगली) यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यभरातून आलेल्या शेकडो प्रस्तावांमधून युवा पत्रकार रुपेश पाटील बाजड यांची निवड झाल्याने पत्रकारिता क्षेत्रातून तसेच मित्रपरिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य पुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.


14
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!