- चिखलीत सहकार्य गणेश मंडळाची इको फ्रेण्डली गणेशमूर्ती
भक्तीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची १२ वर्षांची परंपरा कायम
शाडूमाती व गव्हाच्या ओंब्यांपासून साकारली मूर्ती; ‘अन्न हे पूर्णब्रह्म’चा संदेश देणारा आकर्षक देखावा
चिखली (प्रति.) : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून सर्वत्र भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सहकार्य गणेश मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक अर्थात इको फ्रेण्डली गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, थर्माकॉल तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्यामुळे जलप्रदूषणासह पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन सहकार्य गणेश मंडळाने गेल्या १२ वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत इको फ्रेण्डली गणेशमूर्ती स्थापनेची परंपरा कायम ठेवली आहे.
यंदा मंडळाच्या वतीने शाडूमाती तसेच गव्हाच्या ओंब्यांचा वापर करून गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या देखाव्यातून अन्नदानाचे महत्त्व आणि शेतीचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या भावनेतून अन्नाची नासाडी टाळण्याचा तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करण्याचा सामाजिक संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे.
दरम्यान, २१ सप्टेंबर रोजी सहकार्य गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जात आहे.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि सामाजिक संदेश देणारा आकर्षक देखावा पाहण्यासाठी शहरातील नागरिक, आबालवृद्ध तसेच लहान मुलांची गर्दी होत असून मंडळाच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सहकार्य गणेश मंडळाच्या पर्यावरणपूरक उपक्रमातून प्रेरणा घेत शहरातील इतर गणेश मंडळांकडूनही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष संदीप लोखंडे तसेच जयंत चव्हाण, निलेश भुसारी, श्रीकांत सोळंकी, सुचित भराड, नितीन जांगीड, आशिष गोलानी, संजय कदम, चेतन नागवानी, दत्ता खंडेलवाल, ओम वसु, हर्षल अग्रवाल, वचन वायकोस, निखिल खरपास, अभिषेक काकडे, पवन देशमुख, कृष्णा नागरे, कुणाल म्हस्के, कुणाल चव्हाण यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.








