वैरागडचा अभिमान! आई-वडिलांना खाकी टोपी घालून मारला सॅल्युट; BSF जवान गणेश गवारेचे गावात जंगी स्वागत


वैरागडचा अभिमान! आई-वडिलांना खाकी टोपी घालून मारला सॅल्युट; BSF जवान गणेश गवारेचे गावात जंगी स्वागत

वैरागड जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर एखादा तरुण जेव्हा शून्यातून विश्व निर्माण करतो, तेव्हा केवळ त्याचे कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव अभिमानाने न्हाऊन निघते. असेच काहीसे दृश्य आज वैरागडमध्ये पाहायला मिळाले. सीमा सुरक्षा दलाचे (BSF) कठीण प्रशिक्षण पूर्ण करून गावचा सुपुत्र गणेश संतोष गवारे प्रथमच गावात परतला, तेव्हा संपूर्ण गावकऱ्यांनी त्याचे ‘लोकोत्सव’ असल्यासारखे स्वागत केले.
डोळ्यांच्या कडां पाणावणारा ‘तो’ क्षण
गणेशचे आई-वडील शेतमजूर आहेत. शेतातील कामे आणि घरची आर्थिक परिस्थिती यामुळे ते गणेशच्या प्रशिक्षणाच्या दीक्षांत संचलन (Passing out Parade) समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. ही उणीव गणेशने वैरागडच्या बस स्टँडवर भरून काढली. गावकऱ्यांच्या साक्षीने गणेशने आपल्या कर्तृत्वाचा मान असणारी बीएसएफची ‘कॅप’ (टोपी) आई-वडिलांच्या डोक्यावर ठेवली आणि त्यांना कडक सॅल्युट ठोकला. आपल्या मुलाचा हा प्रवास आणि वर्दी पाहून आई-वडिलांसह उपस्थित सर्वच गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
वैरागडच्या शिरपेचात दुसरा तुरा
वैरागड गावाने नुकताच प्रजासत्ताक दिनी एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. CRPF मध्ये भरती झालेला गावचा सुपुत्र कृष्णा चव्हाण याच्या हस्ते मपूमा शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले होते. या उपक्रमाची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली होती. आज त्याच पावलावर पाऊल ठेवत गणेश गवारे देखील प्रशिक्षण पूर्ण करून परतल्याने, वैरागडच्या शिरपेचात देशसेवेचा दुसरा तुरा रोवला गेला आहे.
गावाकडून जंगी स्वागत.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये

गणेशचे आगमन होताच गावकऱ्यांनी त्याचे औक्षण केले, फटाक्यांची आतिशबाजी केली आणि संपूर्ण गावात त्याचे प्रेरणादायी बोर्ड लावून स्वागत केले. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि तरुण मंडळांनी गणेशची वैयक्तिक भेट घेऊन त्याचा सत्कार केला.

ग्रामीण तरुणांसाठी ‘दीपस्तंभ’
ग्रामीण भागातील अनेक तरुण आजही प्रतिकूल परिस्थितीमुळे हतबल होतात. मात्र, गणेश गवारे आणि कृष्णा पांडुरंग चव्हाण यांसारख्या तरुणांनी प्रतिकूलतेवर मात करत मिळवलेले हे यश चिखली तालुक्यातीलच नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक युवकासाठी एक ‘दीपस्तंभ’ ठरणार आहे. “आपल्या मुलाने देशाचे रक्षण करण्यासाठी घेतलेली ही शपथ आणि घातलेली वर्दी पाहून आमचे कष्ट सार्थकी लागले,” अशा भावना गणेशच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या.


14
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!