चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठा बूस्ट; टाकरखेड हेलगा येथे शेकडो तरुणांचा आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न..!
प्रतिनिधी देवानंद वानखेडे (ता. चिखली) | दि. २३ एप्रिल २०२६
चिखली विधानसभा मतदारसंघातील टाकरखेड हेलगा येथे आज भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाने स्थानिक राजकीय घडामोडींना नवे वळण दिले आहे. भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमधील सुमारे तरुणांनी एकत्रितपणे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा पक्षप्रवेश पार पडला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने झाली. आमदार संजुभाऊ गायकवाड गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्यात सहभागी झालेल्या तरुणांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर लढण्यासाठी पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. तरुणांमधील हा उत्साह व एकजूट यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शिवसेनेत कार्यकर्ता हा माझ्यासाठी जीव की प्राण आहे. कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का बसला, तर तो माझ्या काळजाला धक्का असल्यासारखा आहे. पक्षात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे.”
तसेच त्यांनी पुढील सहा महिन्यांत चिखली तालुक्यात ५० हजार शिवसैनिकांची फौज उभी करण्याचा निर्धार व्यक्त करत, नव्याने पक्षात दाखल झालेल्या तरुणांना संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवदूत तालुकाप्रमुख नितीन राजपूत, मयूर बाहेकर, नितीन सुपे, मनोज लाहूडकर,सतिष अण्णा पाटील,अक्षय कारंडे, उपजिल्हाप्रमुख दीपक तुपकर, गजानन ठेंग, बाळाभाऊ जेऊघाले, गणेश यंगड, गजानन भुसारी, अर्जुन नेमाडे, रोहन करंडे, रामू महाराज इंगळे, गजानन जाधव, संतोष सपकाळ, गणेश चव्हाण, भारत भाऊ सुरुशे, विठ्ठल पाटील, नारायण हेलगे, पिंटू गायकवाड, गणेश भवर, सुमंत इंगळे, रमेश पाटील,यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक नागरिक, गावकरी तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल वानखेडे यांनी केले.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून, विशेषतः तरुणांचा वाढता कल शिवसेनेकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत होण्याचे संकेत या घटनेतून मिळत आहेत.

………. टाकरखेड हेलगा येथील या भव्य सोहळ्याने चिखली मतदारसंघात शिवसेनेची वाढती ताकद अधोरेखित करत राजकीय वातावरणात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.









