काँग्रेस शहराध्यक्ष राहुल सवडतकरांसह शेकडो कार्यकर्ते अखेर भाजपमध्ये दाखल !
चिखली राजकारणात मोठी उलथापालथ ; काँग्रेसचे प्रमुख चेहरे भाजपमध्ये!
राजकीय धक्क्यानंतर काँग्रेसमध्ये आत्मचिंतनाची चर्चा….चिखली /(छोटू कांबळे / द बातमीवाला ) वरून – चिखली शहर काँग्रेसला मोठा धक्का देणारी राजकीय घडामोड घडली असून काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते, मान्यवर आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सवडतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रज चव्हाण, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सवडतकर, नंदूभाऊ सवडतकर, माजी पंचायत समिती सभापती अरविंद बापू देशमुख, डॉ. गुलाबराव सपकाळ, माजी नगरसेवक व संचालक सचिनजी शिंगणे, संतोष गवारे पाटील, अमोल काकडे पाटील, मिलींद पालवे, शुभम बुरकुल यांच्यासह बालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे चिखली तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे नंदूभाऊ सवडतकर, राहुल सवडतकर हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.









