शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय पोवाडा गीत गायन स्पर्धेत आदर्श कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, चिखलीचा मानाचा दुसरा क्रमांक
शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पोवाडा गीत गायन स्पर्धेमध्ये
आदर्श कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, चिखली येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट व प्रभावी सादरीकरण करत दुसरा क्रमांक पटकावून शाळेच्या यशात भर घातली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आदर्श कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्य संकल्पनेवर आधारित पोवाडा सादर करत परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सुस्वर गायन, तालबद्ध सादरीकरण व संघभावनेचे सर्वत्र कौतुक झाले.

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला, प्राचार्या अनुराधा पिंगळे मॅडम, तसेच पर्यवेक्षिका लक्ष्मी भवर व सरला दुबे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे संगीत शिक्षक आकाश गायकवाड व सहशिक्षक गणेश माने यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आदर्श कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, चिखली या संस्थेच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.











