प्रासंगिक लेख:- १० जून जागतिक दृष्टिदान दिन आणि १० ते १६ जून “दृष्टिदान सप्ताह”
“दानात दान दृष्टिदान”
“मरावे परी नेत्ररूपी उरावे”
क्रांतिकारी संत मनुश्री तरुण सागरजी महाराज आपल्या प्रवचनात म्हणतात कि, “जगात सज्जन आणि दुर्जन दोन्ही प्रकारचे लोक असतात. दोघेही जगतात पण दोघात फरक फक्त इतकाच असतो कि, सज्जन दुसऱ्यांना हसवून आणि दुर्जन दुसऱ्यांना रडवून जातात. असे जीवन जगा कि, जेव्हा तुम्ही हे जग सोडून जाल तेव्हा लोक रडतील, तुमची आठवण ठेवतील. असे जीवन जगू नका कि, लोक म्हणतील बरे झाले एक पापी कमी झाला. हे जग सोडतांना लोकांच्या मनात मधुर स्मृती आणि डोळ्यात प्रेमाचे अश्रू ठेवून जा.”
आज जागतिकीकरनाच्या रेट्यात माणूस व्यवहारी बनला आहे. माणसाला आज स्वार्थाशिवाय काहीच दिसत नाही. त्यामुळे जीवन जगतांना एखाद्याला मदतीचा हात देण्यासही माणूस आज तयार नाही. स्वतःच्या भावाला व नातेवाईकाला देखील फसविण्यास माणूस आज मागे पुढे पाहत नाही. मग दुसऱ्या कोणाला मदतीबाबत माणूस काय विचार करणार? त्यातल्या त्यात दान तर बाजूलाच राहते. मदत व दान यामध्ये फरक आहे. मदतीमध्ये थोडा तरी स्वार्थ असतो, ती परत मिळावी असे अपेक्षित असते किंवा त्या व्यक्तीने पुन्हा कधी तरी आपल्या कमी यावे असा स्वार्थ मदत करते वेळी माणसाला असतो. दानात तसे नसते, दान मनापासून द्यायचे असते. दानात कोणत्याही रुपात परतीची अपेक्षा नसते. खर तर स्वार्थाचा विचार देखील मनाला शिवत नाही, दान हे श्रेष्ठ असते. दानासारखे समाधान दुसऱ्या कशातही नाही. प्राचीन काळापासून दानाचे महत्व खूप आहे. हिंदू धर्मग्रंथ रामायण आणि महाभारतात देखील दानाचे महत्व स्पष्ट केले आहे.
पूर्वी दान करणे हा आचरनाचाच एक भाग होता.
महान तत्वज्ञानी चाणक्यजींनी म्हटले आहे कि, “दान से हात कि शोभा बढती ही, आभूषनोंसे नही|” खरच हाताची सुंदरता हि दान करण्यातच आहे. फक्त हातात अलंकार घालून हाताची सुंदरता वाढत नसते. खर तर कलियुगात माणूस स्वार्थी बनत चालला आहे. दान धर्मापासून माणूस नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो खर तर आज ‘दृष्टीदानाला’ महादान मानल्या जाते. दृष्टीदान केल्याने एखाद्याच्या अंधारमय दुनियेत अर्थात दृष्टीहीन माणसाच्या जीवनात दृष्टीदान करून प्रकाशमय जीवन बनवू शकतो. दृष्टी नसलेल्या एखाद्या माणसाला दृष्टी देण्याचे कार्य या दृष्टीदानाद्वारे केले जाते. खर तर आज माणसाने दृष्टीदानाचे जीवनातील महत्व समजून घ्यायला हवे.
खर तर हे संपूर्ण जग फार सुंदर आहे. आपल्या जवळपास असलेल्या प्रत्येक वस्तुत एक विशिष्ट प्रकारची सुंदरता आहे. ते पाहण्यासाठी एका विशिष्ट नजरेची आवश्यकता असते. या जगातील प्रत्येक वस्तू पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यांचा सहारा घ्यावा लागतो. परंतु आपण कधी विचार केला काय कि, जर हे डोळे नसते तर हे जग कसे असते? सगळीकडे अंधार असत, यात तिळमात्र शंका नाही. डोळ्यांचे महत्व जीवन जगणारा प्रत्येक माणूस जाणतोच.
जीवन जगत असतांना डोळे हे माणसाच्या शरीराचे एक महत्वाचे अवयव आहे. डोळ्याद्वारे माणूस संपूर्ण जग पाहू शकतो. खर तर डोळे असणे अर्थात दृष्टी असणे हे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, असे म्हणायला हरकत नाही. परंतु काही लोकांना जन्मतःच दृष्टी नसते अर्थात डोळ्यात काही बिगाड असतो व त्याला कधीच काही दिसत नाही. खर तर अशा व्यक्तींना अंधारमय जीवन जगावं लागते. तसेच काही लोकांना अपघातात किंवा आजाराने आपली दृष्टी गमवावी लागते. जीवन जगात असतांना माणसाने आपल्या डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. खर तर आपल्या डोळ्यांच्या काळ्या भागाला ‘कार्निया’ म्हटले जाते. कार्निया हा डोळ्यांचा पर्दा आहे. जे बाहेरील वस्तूचे चित्र बनवून आपल्याला दृष्टी देतो. जर कार्नियावर एखादी इजा झाली तर आपल्याला दिसणे बंद होऊ शकते.
कर्निया अर्थात नेत्रपटल डोळ्यांच्या बबुलावर काचासारखी लेयर (आवरण) असते. कर्निया अपघातात डोळ्यांना इजा झाल्याने किंवा विशेषतः लहानपणापासून आवश्यक असलेल्या पोषण आहाराच्या कमतरतेमुळे ती क्षतिग्रस्त होते. कर्निया क्षतिग्रस्त झाल्याने दिसने बंद होते.कार्निया क्षतिग्रस्त झाल्याने ज्या व्यक्तीची दृष्टी चालली जाते त्या व्यक्तीच्या कर्निया प्रत्यारोपानाद्वारे पुन्हा दृष्टी प्राप्त करू शकते. कर्नियाच्या जागी लावला जाणारा दुसरा कृत्रिम पर्याय आजपर्यंत दुसरा सापडला नाही. त्यामुळे दृष्टीदानाद्वारे आपण एखाद्याला दृष्टी देण्याचे, हे सुंदर जग पाहण्याची संधी देऊ शकतो. कोणत्याही वयाचा, कोणताही व्यक्ती दृष्टीदानाची शपथ घेवू शकतो. खर तर दान केलेले डोळे कधीच विकत घेतले जात नाही व विकल्या जात नाही हे विशेष. जगातील सर्व धर्मीय पुढार्र्यांनी व पंडितांनी दृष्टीदान हे महादान असल्याचे मान्य करून दृष्टीदानाचे समर्थन केले.
एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीची कर्निया जर कर्नियाच्या समस्येने पिडीत व्यक्तीला मिळाल्या तर त्या पिडीत व्यक्तीच्या जीवनातील अंधार दूर होऊ शकतो. परंतु डॉक्टर मरण पावलेल्या व्यक्तीच्या कर्निया तोपर्यंत काढू शकत नाही जोपर्यंत तो व्यक्ती आपल जीवन जगतांना दृष्टीदानाची शपथ लिखित स्वरुपात करत नाही. ज्या व्यक्तीने लिखित स्वरुपात शपथ घेतली नाही त्या व्यक्तीचे पण कर्निया मृत्युनंतर दान केले जाऊ शकते. जर त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी यासाठी परवानगी दिली तर.
दृष्टीदानाची शपथ घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्युनंतर जवळच्या नेत्र संग्रह केंद्र किंवा नेत्र बँक सोबत संपर्क साधावा. आपण नेत्र संग्रह केंद्र, नेत्र बँक, शासकीय रुग्णालयात दृष्टीदानाबाबत विचार विनिमय करुन आपल्या दृष्टीदानाची लिखित शपथ बाबतीचा फॉर्म भरून आपल दृष्टीदानाच कार्ड घ्यावं खरतर सामौर्ण कुटुंबीयांनी एकत्रित दृष्टीदानाची प्रतिज्ञा घेतली तर सोयीचे ठरते. दृष्टीदानाला सर्वांनी आपल्या कुटुंबाची परंपरा बनवावी.
“जिवंत ज्योत जरी विझली
नेत्र ज्योत तेवत राहील
आपण असू अगर नसू
‘दृष्टी’आपली निरंतर राहील…”
ज्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण समजले नाही, रेबीज, सेफेलीज, एड्स, हिपेटेटीस बी आणि सी, ब्लड कॅन्सर, टेटेनस, कॉलरा आणि इनसेफिलीस या कारणांनी ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ते लोक दृष्टीदान करू शकत नाही. जुन्या समजुतीनुसार असे म्हटले जाते कि, दृष्टीदानात पूर्ण डोळे काढले जातात. परंतु वास्तविकता पहिली असता दृष्टीदानात फक्त कर्निया काढल्या जातात. डोळे हे फक्त आपल्यालाच प्रकाश देते असे नाही तर मेल्यावरही आपण एखाद्याचे जीवन प्रकाशमय करू शकतो. परंतु जेव्हा दृष्टीदानाबाबत बोलले जाते तेव्हा आपल्यामधील अनेक लोक अंधश्रद्धेमुळे माघार घेतात कि, पुढच्या जन्मी आपण दृष्टीहीन न जन्माला येवो. याच अंधश्रद्धेमुळे जगातील अनेक दृष्टीहीन लोकांच्या जीवनात अंधार कायम आहे.
संपूर्ण जगात जवळपास तीन करोड लोक पूर्णपणे दृष्टीहीन आहेत. ८० लाख लोकांचा एक डोळा खराब आहे, तसेच ४ ते ५ करोड लोक कमी दृष्टी असल्याने ग्रस्त आहेत. भारतात जवळपास २५ लाख लोक कर्नियाच्या आजाराने ग्रस्त आहेत. दृष्टिदान केल्यानंतर दृष्टिदान करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर घेण्यात येणाऱ्या काजळी बाबत प्रसिद्ध नेत्र शल्यचिकित्सक तथा वन्यजीव सोयरे डॉ.रवी शिंदे यांनी सांगितले की, ”दृष्टिदान करायचे इच्छापत्र लिहून दिल्यावर मृत्यूनंतर नातेवाईकांनी शक्य तितक्या लवकर म्हणजे मृत्यूनंतर जास्तीत जास्त ६ तासामध्ये मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बॅकेत जमा होतील, असे पहावे. त्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर नेत्र बँकेत दूरध्वनी करुन खालील बाबीची पूर्तता करायला हवी. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा. पंखा चालू असल्यास तो बंद करावा. शक्य असल्यास अधूनमधून सूक्ष्म जंतूनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टाकावे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. मृत पावलेल्या व्यक्तीचे डोके अंदाजे ६ इंच वर उचलून ठेवावे. असे केल्याने डोळे काढताना रक्तस्त्राव टाळता येईल. प्रत्येक माणसाने दृष्टिदान संकल्प घ्यायला हवे”
दृष्टीदानाचे महत्व समजून घेण्यासाठी १० जून जागतिक दृष्टिदान दिन आणि १० ते १६ जून दरम्यान दरवर्षी आपण दृष्टीदान सप्ताह साजरा करतो. या दृष्टीदान सप्ताहात दृष्टीदानाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. भारतात सर्व लोकांनी दृष्टीदानाची संकल्पना केली तर भारतात एक दिवस असा येईल कि, भारतात एकही कर्नियाने ग्रस्त दृष्टीहीन व्यक्ती राहणार नाही. या दृष्टीदान सप्ताह निमित्त सर्व देशवासियांनी दृष्टीदानाची शपथ घ्यावी तसेच जागृत राहावे, चला तर आपण सारे मिळून दृष्टीदानाची शपथ घेवू या! एव्हडीच दृष्टीदान सप्ताह निमित्त अपेक्षा!
-नितीन प्रतापसिंह श्रीवास्तव
“प्रताप-गढ”,शिवशंकर नगर
बुलडाणा,मो.नं ९४२१४९४०४०
मो.नं.९४२१४९४०४०









