अकोट येथे ‘लवंगी फटाका’ गीताचे शानदार लोकार्पण
चेतन जाधव यांच्या कलाकृतीला रसिकांची पसंती
विशाखा24न्यूज
श्री सिद्धार्थ धंदरे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
अकोट, दि. २४ जून २०२६ : विदर्भातील नवोदित आणि प्रतिभावान कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या व्हिडिएटिक्स युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या ‘लवंगी फटाका’ या नव्या मराठी गीताचे अकोट येथे उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र, गीतकार, संगीतकार व दिग्दर्शक चेतन जाधव यांनी या गीताचे लेखन, संगीत दिग्दर्शन आणि दिग्दर्शन केले असून त्यांच्या बहुआयामी कलागुणांची पुन्हा एकदा प्रचिती या गीतातून आली आहे. विविध संगीत प्रकल्पांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या चेतन जाधव यांनी महाराष्ट्रभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एक कुशल संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची राज्यभर विशेष ओळख आहे.
या गीताचे लोकार्पण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कवी, शाहीर व गायक अनिलजी वानखडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या, समाजसेविका व रमाई ब्रिगेड विदर्भ नेत्या सुवर्णाताई वानखडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाला मंजुताई वानरे, चंद्रशेखर धुंदे, ज्योतीताई बनसोडे, मीराताई धुंदे, वनिताताई भाटे, मेहुल व्यास यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार उपस्थित होते.
गीतामध्ये सुगत पळसपगार, जीविका आणि हर्षल काटोले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या गीताच्या निर्मितीची धुरा कोमल पळसपगार यांनी सांभाळली असून व्हिडिएटिक्स मीडियाचे प्रोडक्शन असिस्टंट जय कोरडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी वानखडे यांनी केले. चेतन जाधव यांनी प्रास्ताविकातून गीत निर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला, तर सुगत पळसपगार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘लवंगी फटाका’ हे गीत प्रदर्शित होताच रसिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, या गीतामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कलाकारांच्या प्रतिभेला नवे व्यासपीठ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









