मेरा बुद्रुक येथील बिअर शॉपी, वाईन बारमध्ये धाडसी चोरी !
लाखोचा मद्यमाल, रोख रकमेसह लंपास!
चिखली प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मेरा बुद्रुक येथील मेरा बुद्रुक फाटा ते गाव रस्त्यावर असलेल्या सोहम बियर बार रेस्टॉरंटवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या २.३० ते ३.०० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून बियर शॉपी वाईन बार मधे असलेला लाखोचे बियर व विदेशी दारूचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.याविषयी सविस्तर माहिती अशी की निखिल पडघान यांचे मेरा बुद्रुक फाटा ते गाव रस्त्यालगत सोहम बिअर बार अँड रेस्टॉरंट आहे निखिल पडघान नेहमीप्रमाणे दिनांक २२ एप्रिल च्या रात्री १० वाजता बिअर बार बंद करून कुलूप लावून घराकडे गेले.सकाळी बार मालक निखिल पडघान आठ वाजेच्या दरम्यान शेताकडे जात असताना ते बियर बार वर थांबले असता त्यांना बिअर शॉपी चे शटर अर्धवट खोललेले दिसले,कटरने दुकानाचे कुलूप तोडून दुकानाच्या बाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वायर लाईटचे वायर त्यांना काटलेले दिसले,बियर बार त्यांनी खोलले असता बारमधील गोडाऊन मधील सर्वच विदेशी दारूचे बॉक्स त्यांना तिथे आढळून आले नाही, व बियर शॉपी मधील बियरचे बॉक्स सुद्धा चोरट्यांनी डल्ला मारल्याने या चोरीच्या घटनेची तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनला दिली असून या चोरीच्या घटनेचा पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार भरत पोफळे करीत आहे.









