कालकथित माजी सुभेदार शामराव खरात यांच्या श्रद्धांजली निमित्ताने एक आठवण…..


कालकथित माजी सुभेदार शामराव खरात यांच्या श्रद्धांजली निमित्ताने एक आठवण…..

चिखली : दि. २१-०६-२०२६ रोजी मूळचे टाकरखेड मुसलमान, ता. चिखली, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या भारतीय सैन्यामधे फार मोठी सेवा केलेल्या व परिसरातील गावलोकांमधे सामाजिक कार्यकर्ते या नात्याने लोकप्रिय असलेल्या शामराव नाथाजी खरात यांचे वयाच्या अंदाजे ९० व्या वर्षी वृध्दापकाळ तथा दुर्धर आजाराने परवा चिखली येथे निधन झाले आणि दि. २१-०६-२०२६ रोजी त्यांच्या जलदान / पुण्यानुमोदन विधी निमित्ताने श्रध्दांजली सोहळ्यात हजर झालो. थोडा विलंब झाल्यामुळे आणि दुपार होत असल्याने उन्हाचा भर वाढू लागल्याने उपस्थित मंडळींच्या हालचालींवरून सूत्र संचालक विधी कर्ता यांनी श्रध्दांजली निमित्ताने होत असलेली भाषणे आवरती घेत उर्वरीतांची क्षमा मागून भन्तेजींकडे पुढील विधीची सूत्रे सोपवली. आणि मला का. खरात यांच्या भेटीची दिल्ली येथील अंदाजे पन्नास वर्षांपूर्वीची आठवण सांगावयाची राहून गेली. ती सल कायम मनात बोचू नये यासाठी हे निवेदन करीत आहे.
अंदाजे १९७४ ते ७६ च्या दरम्यान मी, माझे बंधू ( आता सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी ) पी. एस्. कस्तुरे, एकेकाळी महाराष्ट्रभर सूरसंगम ऑर्केस्ट्रा मधून मधूर फिडल वादनामुळे गाजलेले कलावंत सुधाकर हिवाळे
एस्. जी.जाधव ( आताचे सेवानिवृत्त तत्कालीन म. फुले विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक, बुलढाणा ), डी. आर. चव्हाण ( आताचे सेवानिवृत्त तत्कालीन म. फुले विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक, बुलढाणा ), अधिक दोघे मित्र असे औरंगाबाद ( आताचे छ. संभाजीनगर ) येथे बाबासाहेबांच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवनात ते वेगवेगळ्या व मी विधी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बं. नं. ६, लक्ष्मी कॉलनी, प्रा. चिटणीस सरांच्या शेजारी, वऱ्हाडचा वाघ म्हणून ख्याती प्राप्त आंबेडकरी चळवळीतील सेनानी सुखदेव राव जाधव, चिखली यांची भाची आणि बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ द रूपी या ग्रंथावर पहिल्यांदा पीएचडी करणारे प्रा. एम्. एल्. कासारे यांची मावसबहिण मंदाताई ऊर्फ आक्का दाभाडे यांच्याकडे राहत असताना, आकस्मिक, भारताची राजधानी दिल्ली येथे जाण्याचा योग आला. आमच्या सारख्या तत्कालीन केवळ शिष्यवृत्ती व महाविद्यालयातून मिळणाऱ्या सुकडीवर कसेतरी दिवस काढणाऱ्या आणि खोलीचे अकरा रुपये भाडेही अनेक महिन्यांपासून अंगावर असणाऱ्यास दिल्लीला जाण्याची संधी मिळणार ही बाब म्हणजे आभाळ दोन बोटे राहिल्यासारखे न झाल्यास नवल होते.

ही संधी मिळण्याचे कारण म्हणजे त्याकाळी त्या कॉलनीतीलच एक पोस्ट कर्मचारी पी. वाय. वाघमारे दादाआणि लक्ष्मी कॉलनी व नागसेन वनातील इतर काही कर्मचारी, ( नंतरच्या काळात बुलढाणा येथे ग्रामसचिव तथा कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले ) ठाकरे बंधू , बाबासाहेबांच्या महाविद्यालयात शिकून नंतर तेथेच प्राध्यापक व प्राचार्य झालेल्या पी. के. भालेराव सरांचे साले अशोक साळवे ( देना बँक अधिकारी ) अशी बरीच मंडळी तत्कालीन डी. संजीवय्या यांनी स्थापन केलेल्या व संस्थापक अध्यक्ष असलेल्या, फेडरेशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट्स – शेड्यूल्ड ट्राईबस् वेल्फेअर असोसिएशन्स मधे मोलाचे योगदान देवून काम करीत होती. बहुतेक शंकरराव सुरडकर हे चळवळीतील कार्यकर्ते त्यामधे महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी होते. ( नंतर त्यातून वेगळे निघून त्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र संघटना, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या संवर्धनासाठी काढली व नंतर त्यातूनच कर्मचारी हितसंवर्धन कार्याशी जुळलेले कृष्णा इंगळे यांनी आणखी वेगळी संघटना माझ्या व इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मेहाडीया बिल्डींग, नागपूर येथे झालेल्या बैठकीत आम्ही सुचवल्याप्रमाणे कास्ट्राईब या नांवाने स्थापित करून त्याचे ते अध्यक्ष झाले. ) त्या फेडरेशन च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी मी एक होतो.
त्या संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीस आयोजित करण्यात आल्याचे व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यामधे उपस्थित राहण्यासाठी पत्र आणि रेल्वेच्या मोफत प्रवासाचा मराठवाड्यातील बारा जणांसाठी संयुक्त पास सुध्दा आला होता. त्या कारणास्तव मी वकीली व्यवसायात असल्याने माझे नांव पहिले घेण्यात आले व सोबत वाघमारे दादा, अशोक साळवे, ठाकरे बंधू आपापल्या कुटुंबासह, अधिक इतर पाच जण असे दिल्लीस सदर अधिवेशनासाठी गेलो. माझा इतर खर्च सर्व मित्रांनी मिळून केला होता.
तत्कालीन विधी महाविद्यालयीन शिक्षण घेताना आमच्या सोबत भारतीय सैन्यामधील औरंगाबाद छावणीमधील कॅप्टन बापूराव, मेजर क्रिष्णन आणि हेडक्लर्क ताराचंद ही हरियाणाची अधिकारी मंडळी सुद्धा डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात आमच्या बरोबर होती व घनिष्ठ मित्र म्हणून भारतीय सैन्यामधे जवानांची भरती करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करावी म्हणून ते आम्हाला नेहमी आग्रह करीत राहायचे. त्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर मी चिखली येथील माझा बालमित्र काल्या ऊर्फ रामकिशन नामदेव शिंदे, आमच्या एका जैन फिरत्या कापड व्यापारी मित्राचा मुलगा ( व माझा मानसपुत्र ) अभय मनोहरराव वायकोस आणि माझे मित्र चिखली येथील प्रतिष्ठित व्यापारी रामपाल लढ्ढा यांचा एक नातेवाईक तरूण शर्मा व इतरही बऱ्याच जणांना भारतीय सैन्यात भरती केले होते. ( माझ्या अशा सहकार्यामुळे मला औरंगाबाद छावणीमधील माझ्या त्या मित्र अधिकाऱ्यांनी मानद भरती अधिकारी म्हणून शिफारस केली होती. त्यामुळे औरंगाबाद छावणीमधून बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदा सैनिक भरती ची सुरुवात मी चिखली येथून करून नंतर पूर्ण जिल्ह्यातील विश्राम गृहावर सैनिक भरती चे कार्यक्रम जवळजवळ पंधरा वर्षे राबविले व शेकडो जवान त्यामुळे औरंगाबाद छावणीमधून भारतीय सैन्यामधे भरती झाले. त्यापैकी रामकिसन शिंदे हा त्यावेळी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील सैनिक चमू मधे तैनात असल्याचे त्याने पत्राने मला कळवून आपल्या जिल्ह्यातील चिखली जवळील गावचे शामराव खरात हे व आणखी एक बोरकर नांवाचे सैनिक त्याच्या बरोबर राष्ट्रपतींच्या एडीसी पथकात असल्याचे अधूनमधून पाठवलेल्या पत्रात सांगत होता. आम्हाला अधिवेशनासाठी दिल्लीला यायचे असल्याचे मी त्याला पत्र दिल्याने आम्ही त्यांना भेटायला राष्ट्रपती भवनातील साऊथ व नॉर्थ ब्लॉक येथे यावे असा आग्रह त्यांनी करून त्यांच्या अधिकाऱ्यांची परवानगीही घेऊन ठेवली होती.
म्हणून अधिवेशन आटोपल्यावर आम्ही त्यांच्याकडे साऊथ ब्लॉक येथे नियुक्त अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गेलो तेव्हा तेथे शामराव खरात यांची भेट झाली. त्यांनी त्यांची ओळख सांगितली.
त्या सर्वांना मोठा आनंद झाला. आम्हाला त्यांनी साऊथ व नॉर्थ ब्लॉक मधील त्यांच्या नियुक्तीची माहिती देवून परवानगीने संसदभवन सुध्दा बाहेरून दाखविले. तेथील अधिकाऱ्यांसोबत चहा दिला. हा आनंद आमच्या आयुष्यातील त्याकाळातील सर्वात मोठा आनंद होता. आम्ही पहिल्यांदा देशाची राजधानी जेथे बाबासाहेबांच्या संविधानाचा पहिला गजर झाला होता ते संसद भवन पाहिले होते. आणि तो आनंद केवळ रामकिसन शिंदे आणि शामराव खरात यांच्यामुळे आम्हाला मिळाला असल्याने ते क्षण आमच्या जीवनातील अविस्मरणीय ठरले.
नंतर आम्ही तेथून परतलो.
दिल्ल फेडरेशन च्या संबंधित अधिवेशनात सहभागी होऊन वरील सैनिकांची भेटही झालेली असल्याने व वाघमारे दादांना अधिक सुटी नसल्याने व मलाही इतरांच्या मदतीवर तेथे जास्त राहणे शक्य नसल्याने आम्ही दोघांनी संयुक्त मोफत प्रवासी पासमधून दोघांचा पास येणकेणप्रकारेण वेगळा करून घेवून आम्ही औरंगाबाद येथे परत आलो.
अशी ती आमच्या जीवनातील अविस्मरणीय आनंदाची स्मृती मी शामरावजींच्या जलदान विधीवेळी सर्वांसमोर मांडू शकलो नाही ही खंत सल म्हणून सतत मनाला टोचत राहू नये या करिता माझ्या मोडक्यातोडक्या शब्दात मांडून ही माझी श्रध्दांजली अर्पण करीत आहे.

                 — ॲड. विजयकुमार कस्तुरे…..
                           ९८५०२७५१०४.


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!